कसे वाचेल ठिबक खराब होण्यापासून?

कसे वाचेल ठिबक खराब होण्यापासून

ठिबकसाठी कोणते फिल्टर वापरावे ?

सूक्ष्म सिंचन प्रणालीत सर्वात प्रभावशाली तंत्र म्हणजे ठिबक सिंचन. या तंत्राद्वारे पाणी पिकांच्या मुळांच्या कार्यक्षम कक्षेत मोजून मापून थेंबा थेंबाने दिले जाते. या तंत्रात उपलब्ध पाण्याची गुणवत्ता हा एक महत्वाचा विषय आहे. कारण, पिकांना दिले जाणारे पाणी नदी, नाला, शेततळे, बोअरवेल इ. विविध स्त्रोतांपासून शेतापर्यंत येते. ह्या स्त्रोतांपासून पाणी येताना त्यात शेवाळ, वाळू, केर-कचरा अशी घाण येऊ शकते. ज्यामुळे ठिबक संचात हि घाण जाऊन संपूर्ण संचच बंद पडण्याची दाट शक्यता आहे. ह्यावर उपाय म्हणजे “ गाळण यंत्रणा ( फिल्टर्स ) ”. फिल्टर्स हे ठिबक संचाचा अविभाज्य व आवश्यक घटक आहे.

फिल्टरचे प्रमुख प्रकार :-

पामुख्याने फिल्टर्स चे दोन प्रकार पडतात.
१) प्रायमरी फिल्टर्स
२) सेकंडरी फिल्टर्स

१) प्रायमरी फिल्टर्स :- ह्याचे दोन प्रकार आहेत.

Sand Filter

अ) वाळूची गाळण यंत्रणा ( सॅंड फिल्टर )

Hydrocylone filter

ब) शंकू फिल्टर

२) सेकंडरी फिल्टर्स :- ह्याचे दोन प्रकार आहेत.

Screen Filter

अ) जाळीची गाळण यंत्रणा ( स्क्रिन फिल्टर )

Disc filter

ब) चकतीची गाळण यंत्रणा ( डिस्क फिल्टर )

कोणते फिल्टर केंव्हा वापरावे ?

 • शास्त्रोक्त नियम असा आहे की जिथे सेकंडरी फिल्टर वापरला आहे तिथे प्रायमरी फिल्टर नसला तरी काम भागेल पण जिथे प्रायमरी फिल्टर वापरला आहे तिथे सेकंडरी फिल्टर आवश्य वापरलाच पाहिजे.
 •  जेथे उघड्या पाण्याचा स्त्रोत आहे उदा :- नदी, नाला, शेततळे इ. तेथे शेवाळ निर्मिती जास्त प्रमाणात होते. तसेच मोठ्या प्रमाणात केर-कचरा वाऱ्याने उडत येऊन पाण्यात साचतो. हे शेवाळ, कचरा मोठ्या प्रमाणात पाण्यात मिसळून शेतापर्यंत येते. ह्यामुळे स्क्रिन फिल्टरची जाळी चोक अप होऊ शकते. परिणामी ठीबकच्या नळ्या व ड्रीपर्स चोक होऊन संपूर्ण ठिबक संचच बंद होण्याची शक्यता असते. अश्या परिस्थितीत सॅंड फिल्टर वापरणे गरजेचे आहे.
 • सॅंड फिल्टर मोठ्या प्रमाणात पाण्यासोबत आलेली घाण शेवाळ, केर-कचरा छोट्या छोट्या तुकड्यात रुपांतरीत करते व पाणी पुढे पाठविते. नंतर सेकंडरी फिल्टर ( स्क्रिन किंवा डिस्क फिल्टर  ) उरलेला कचरा पाण्यातून काढून टाकून स्वच्छ पाणी ठिबक संचास पुरविते.
 • ज्या ठिकाणी पाण्याच्या स्त्रोतात रेती असते तिथे मोठ्या प्रमाणात वाळूचे कण पाण्यासोबत वाहत येतात. अश्यावेळेस ह्या वाळूच्या कणांमुळे ठिबक नळ्या व ड्रीपर्स चोक होऊन संच बंद पडू शकतो. म्हणून ह्या कणांपासून ठिबक संचाचे रक्षण व्हावे यासाठी शंकू फिल्टर वापरावा व नंतर सेकंडरी फिल्टर म्हणून स्क्रिन किंवा डिस्क फिल्टर वापरावे.
 • जेथे शेवाळ व रेती हे दोन्ही पाण्यामध्ये मोठ्या आढळतात तेथे सॅंड फिल्टर व शंकू फिल्टर दोन्ही वापरावे. अश्या वेळी शंकू फिल्टर आधी व सॅंड फिल्टर नंतर वापरावा. कारण, बारीक रेतीचे कण सॅंड फिल्टरच्या वाळूत मिसळून त्यातील कार्यक्षम सॅंड ( वाळू ) खराब करू शकते. त्यामुळे सॅंड फिल्टरचे कार्य बंद होऊन पुढील स्क्रिन फिल्टर मध्ये वाळू जाईल व स्क्रिन फिल्टरची जाळी चोक अप होऊन ते वारंवार बंद पडू शकते. म्हणून आधी शंकू मग सॅंड व नंतर स्क्रिन किंवा डिस्क फिल्टर अशी मांडणी असावी.
 • स्क्रिन फिल्टरच का जास्त प्रमाणात वापरले जाते ? कारण, ते डिस्क फिल्टर पेक्षा स्वस्त असते व त्याला कमी देखभालीची गरज असते. पण, स्क्रिन फिल्टरमध्ये एकच जाळी असते व डिस्क फिल्टरमध्ये आलेले पाणी अनेक अडथळ्यांमधून पार होते जिथे पाण्यातील घाण अधिक कार्यक्षमतेने पाण्यातून काढली जाते. स्क्रिन फिल्टरमधील जाळी फर्टीगेशन द्वारा दिल्या जाणाऱ्या रसायनांच्या प्रभावामुळे गंजू शकते व खराब होऊ शकते. पण डिस्क फिल्टरमधील चकत्या प्लास्टिकच्या असल्यामुळे हा प्रश्नच उद्भवणार नाही. म्हणून डिस्क फिल्टर अधिक कार्यक्षम आहे.

फिल्टर्सची कार्यपद्धती :-

१) पाण्यात तरंगणारी सर्व प्रकारची घाण हि मोठ्या प्रमाणात पाण्याबरोबर येते. त्यामुळे स्क्रिन फिल्टर वारंवार चोक अप होईल. म्हणून सॅंड फिल्टर वापरण्यात यावे.

२) मोठ्या प्रमाणात येणारी हि घाण सॅंड फिल्टर मध्ये जमा झाली की फिल्टर मधील कार्यक्षम व विशिष्ठ प्रकारे धार दिल्या गेलेली वाळू ( सॅंड ) ह्या घाणीचे छोट्या छोट्या तुकड्यात रुपांतर करून पाणी आउटलेट द्वारे पुढे पाठविते. आता हि छोट्या छोट्या तुकड्यात रुपांतरीत झालेली घाण पाण्यासोबत पुढे जाण्याची शक्यता आहे म्हणून ती आडविण्यासाठी संचाच्या मांडणीमध्ये  स्क्रिन फिल्टरची किंवा डिस्क फिल्टरची आवश्यकता आहे.

३) जेंव्हा पाण्याचा स्त्रोत नदी असतो किंवा नदीकाठच्या जमिनीतील विहीर / बोअर असतो. तेंव्हा रेतीचे बारीक कण ( रेताड ) मोठ्या प्रमाणात पाण्यासोबत येतात ज्यामुळे स्क्रिन फिल्टर थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने चोक अप होऊ शकते. अश्या परिस्थितीत शंकू फिल्टर कामास येईल. म्हणून संचाच्या मांडणीत शंकू फिल्टर व नंतर सेकंडरी फिल्टर असावा.

४) आकार शंकूसारखा म्हणून याला शंकू फिल्टर असे म्हणतात. यात एका खाली एक अश्या चकत्या असतात. पाणी इनलेट मधून आत येते व ह्या चकत्यांमधून  वेगाने गोल-गोल फिरविले जाते. त्यामुळे पाण्यातील जड कण खालच्या बाजूस कलेक्शन टॅंकमध्ये जमा होतात व कणविरहीत पाणी आउटलेटद्वारे पुढे पाठविले जाते. कलेक्शन टॅंकला असलेल्या झडपेतून हे जमा झालेले वाळूचे कण काढता येतात. यात पाण्यासोबत शेवाळ आले तर तेही पाण्यासोबत बारीक तुकड्यांत पुढे जाईल म्हणून जोडणीत सेकंडरी फिल्टर लावणे जरुरी आहे.

५) फिल्टर्स नेहमी उच्च क्षमतेचेच लावावेत.

६) बऱ्याच वेळेस अशी शंका येते की फिल्टर्स मुळे पाण्याच्या दाबावर काही परिणाम होत असेल ? तर, सेकंडरी फिल्टरची जाळी चोक अप असल्यास मागील पाण्याचा दबाव वाढेल नाही तर पाणी पुढे जात राहील. अधून-मधून फिल्टरची जाळी साफ करीत जावी म्हणजे हा प्रश्न उद्भवणार नाही.

७) सॅंड फिल्टरमध्ये तीन वेगवेगळ्या आकारांची वाळू एकत्र स्वरुपात असते. ह्यात घाण जमा होऊन ते अकार्यक्षम होऊ नये यासाठी इनलेट, आउटलेट व बॅकफ्लश बंद करून फ्लश उघडावा व त्यातून वेगाने पाणी आत सोडावे त्यामुळे वाळूत अडकलेली घाण स्वच्छ होऊन फ्लशवाटे निघून जाईल. कालांतराने जास्त प्रमाणात घाण जमा झाल्यास फिल्टरवर दिलेले चार नट उघडून वाळू काढून घ्यावी आणि अॅसिडयुक्त पाण्याने धुवून परत फिल्टरमध्ये भरावी.  

ठिबक सिंचन संचाच्या गाळण यंत्रणेची देखभाल

सूक्ष्म सिंचनाचा आत्मा म्हणजे गाळण यंत्रणा ( फिल्टर्स ).परंतु हे गाळण यंत्र फार महागडे असल्यामुळे कोणत्या प्रकारचे गाळण यंत्र ( फिल्टर ) आपल्याला पाहिजे ह्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे जवळपास सर्वच संचात जाळीचा फिल्टर ( स्क्रिन फिल्टर ) बसविलेला असतो. परंतु सिंचनाचे क्षेत्र जास्त असेल आणि पाण्यात शेवाळ, सेंद्रिय पदार्थ इ. हमखास येत असतील तर वाळूचे गाळण यंत्र( सॅंड फिल्टर )  लावावे. अन्यथा जाळीचे किंवा चकतीचे गाळण यंत्र( डिस्क फिल्टर ) लावावे. जुन्या बोअरवेल किंवा नवीन खोदलेल्या विहिरीतील पाण्याव्दारे असे कण येत असतात. यासाठी हायड्रोसॉयक्लान फिल्टर ( शंकू फिल्टर ) वापरावा.

अ) स्क्रीन फिल्टर (जाळीची गाळणी) ची स्वच्छता :-

ठिबक सिंचन पाण्याच्या गाळणीसाठी स्क्रीन फिल्टर वापरतात. सामन्यत: १२० मेश (०.१३ मिमी) आकाराच्या छिद्रांची जाळी वापरले जाते.

 • प्रथमत: संच बंद करून स्क्रीन फिल्टर दाब विरहित करावे.
 • फिल्टरचे बाहेरील आवरण खोलून फिल्टर ची जाळी वेगळी करावी व स्वच्छ पाण्याने साफ करावी.
 • रबर सील जाळी पासून काढून आवश्यकता असल्यास नवीन बसवून सील व्यवस्थीत असल्याची खात्री करावी.
 • फिल्टर च्या तळाशी असलेल्या व्हॉल्व्हचा  उपयोग करून जाळी भोवतीची घाण काढून टाकावी.

ब) सँड/ ग्रॅव्हेल फिल्टरची (वाळूची गाळणी) स्वच्छता :-

धरणे, नद्या, कालवे यांतील पाण्यातून येणारे शेवाळ, सेंद्रिय पदार्थ व कचरा वेगळा करण्यासाठी सँड/ ग्रॅव्हेल फिल्टरचा उपयोग होतो. ग्रॅव्हेल फिल्टरच्या अगोदर व पुढे असे २ दाबमापक यंत्रे (प्रेशर गेज) बसवलेले असतात. दाबमापक यंत्रातील पाण्याच्या दाबाचे १० टक्क्यापेक्षा जास्त पतन झाल्यास ग्रॅव्हेल फिल्टर साफ करावे, किंवा आठवड्यातून एकदा साफ करावे. याची स्वच्छता करताना बॅक फ्लशिंग (विरुध्द प्रवाह) तंत्राचा वापर करतात. याद्वारे पाण्याचा प्रवाह विरुध्द दिशेने करून फिल्टर साफ केले जाते  ते खालीलप्रमाणे:

 • सिंचनप्रणाली चालू असताना बायपास व्हॉल्व्ह पूर्णपणे उघडा करून बॅक फ्लशिंग व्हॉल्व्ह पूर्णपणे चालू करावा.
 • मुख्य कंट्रोल व्हॉल्व्ह व आऊटलेट व्हॉल्व्ह पूर्णपणे बंद करावा.
 • फ्लशिंग करते वेळी बायपास व्हॉल्व्ह अंशत: बंद करून सिंचन प्रणालीचा दाब सामान्य दाबापेक्षा ३० टक्के अधिक वाढवावा.
 • बॅक फ्लश व्हॉल्व्हमधून स्वच्छ पाणी येईपर्यंत पंप चालू ठेवावा. स्वच्छ पाणी आल्यानंतर पंप बंद करावा.

क) हायड्रोसायक्लोन फिल्टरची (शंकू फिल्टर ) स्वच्छता:

या फिल्टरचा उपयोग सिंचनाच्या पाण्यातील वाळूचे कण वेगळे करण्यासाठी होतो. हा फिल्टर नरसाळ्याचा आकाराचा असतो, त्याचा निमुळता भाग तळाशी एका आडव्या टाकीला जोडलेला असतो. टाकी मध्ये पाण्यातून वेगळी काढलेली वाळू गोळा होते. टाकीला असलेला हॉल्व्ह उघडून जमा झालेली वाळू काढून टाकावी.

ड) डिस्क फिल्टरची ( चकतीचा फिल्टर ) स्वच्छता:

या फिल्टरचा उपयोग सिंचनाच्या पाण्यातून घन कण काढून टाकण्यासाठी होतो.

 • डिस्क फिल्टर उघडून सर्व चकत्या मोकळ्या कराव्यात व एका दोरीत बांधून घेऊन स्वच्छ पाण्यात धुवून घ्याव्यात.
 • मोठ्या बादलीत १० टक्के तीव्रतेचे हायड्रोक्लोरिक अॅसिड अथवा हायड्रोजन परॉक्साईड च्या द्रावणात या चकत्या साधारणपणे अर्धा तास ते दोन तास बुडवून ठेवून स्वच्छ धुवून घ्याव्यात.
 • सर्व चकत्या पूर्वी होत्या त्या स्थितीत ठेवून फिल्टर ची जोडणी करावी.

2 thoughts on “कसे वाचेल ठिबक खराब होण्यापासून?

 1. शिवाजी गाडे says:

  १ एकर चे ठिबक सिंचन पाहिजे १०,५०० किंमतीचे हिरा अॅ ग्रो कंपनीचे youtub ला व्हिडीओ आहे
  ९९२१४३४३६७ शिवाजी गाडे पा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *