सूक्ष्म सिंचन प्रणाली : तुषार सिंचन (फवारा सिंचन)

सूक्ष्म-सिंचन-प्रणाली

तुषार सिंचन पद्धतीचे महत्व :

प्रचलित पद्धतीद्वारे पिकास पाहिजे तेवढे पाणी सर्व ठिकाणी सारखे देता येत नाही. कोठे कमी तर कोठे जास्त पाणी बसते. त्यामुळे पिकास ठराविक उंचीचे पाणी देण्यासठी जास्त पाणी द्यावे लागते. जास्त दिलेले पाणी मुळच्या शोषण कक्षेच्या खाली जाते. हा अपव्यय जवळजवळ २० ते २५ टक्क्यांपर्यंत होतो. याबाबी लक्षात घेतल्यास तुषार व ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करणे हे सद्य काळाची गरज आहे. कारण दिवसेंदिवस पाण्याचा तुटवडा पडत आहे. लोकसंख्या वाढत आहे पिकाखालील क्षेत्र अति पाणी वापरामुळे दिवसेंदिवस नापीक होत आहे. आणि जमिनी क्षारमय होत आहे. पिकास पाणी देण्याच्या प्रचलित प्रवाही पद्धतीच्या तुषार व ठिबक सिंचन पद्धतीनं अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. कारण धरणातून पाटाद्वारे वाहते पाणी. प्रचलित प्रवाही पद्धतीद्वारे पिकास दिले जाते. पाटपाण्याच्या वाहतुकीद्वारे साधारणत: ६० ते ६५% पाण्याचा नाश होतो. पर्यायाने प्रचलित प्रवाही सिंचन पद्धतीद्वारे पाहिजे तेवढी सिंचन क्षमता मिळत नाही. यामुळे राज्यामधील जलसिंचन प्रकल्पाची सिंचन क्षमता ३५ ते ४०% च्या वर जावू शकत नाही. म्हणूनच पाण्याच्या कार्यक्षम उपयोगाकरिता तुषार व ठिबक सिंचन पद्धतीचे अवलंब करणे गरजेचे झाले आहे. सिंचनासाठी आराखडा व पूर्व नियोजन आवश्यक आहे. कृषी विद्यापीठ राहुरी येथील प्रयोगावरून तुषार सिंचनामुळे ३०% पाण्याची बचत झाल्याचे दिसून येते.

तुषार सिंचन पद्धतीची (वैशिष्टे) फायदे :

फवारा सिंचन पद्धतीमध्ये अॅल्युमिनियम किंवा पी.व्ही.सी. पाईप ला जोडलेल्या स्प्रिंकलर नॉझल्सव्दारे पाण्याचा दाबाचा वापर करून पाणी पावसाप्रमाणे पिकावर सर्व ठिकाणी सारखे फवारले जाते. पाण्याचा दाबाचा वापर करून नोझल्स ठराविक वेगाने कायम वर्तुळाकाररित्या फिरवण्याची सोय असते. पाईपमधून दाबाने आलेले पाणी नोझल्समधून तुषारासारखे पिकावर फवारले जाते. उन्हाळी हंगामात हि पद्धत वापरताना सकाळी अथवा संध्याकाळी पाणी द्यावे. त्यायोगे पाणी अपव्यय कमी होतो. पाणी पानावर पडल्याने चिकट्यासारखे रोग धूवून जातात. पाण्याबरोबर खते, कीटकनाशके व अन्य औषधे मिसळून फवारणी करता येते. जमिनीचा पोत व घडण चांगली राहते. जास्त क्षेत्र ओलिताखाली येते व उत्पादन वाढीस मदत होते. मात्र सुरुवातीला भांडवली खर्च सुमारे १५००० ते ३०००० प्रती हेक्टर असल्याने अनुदानाशिवाय वापर अवघड आहे. या पद्धतीची काही वैशिष्टे खालीलप्रमाणे आहे.

 • प्रवाही सिंचनापेक्षा तुषार पद्धतीत पाण्याचा अपव्यय होत नसून सिंचन क्षमता हि प्रवाही सिंचनपेक्षा जास्त मिळते. (७० ते ८० टक्के)
 • तुषार किंवा फवारा सिंचन पद्धती जवळ जवळ सर्व पिकांच्या सिंचनासाठी वापरता येते.
 • फवारा सिंचनामुळे पाण्याची जवळ जवळ २५ ते ३५ टक्के बचत होते.
 • सर्व ठिकाणी समप्रमाणात पाहिजे तेवढे पाणी देता येते.
 • पाण्याचा प्रवाह कमी असताना सुद्धा पाहिजे तेवढे पाणी देता येते.
 • तुषार पद्धतीत पाणी पावसाप्रमाणेच पाणी पिकावर पडत असल्याने पानावरील किडे धुवून जाऊन पाने स्वच्छ राहतात.
 • या सिंचन पद्धतीद्वारे रासायनिक खते पाण्याबरोबर पिकास देता येतात. सर्व ठिकाणी सारखे आणि पाहिजे तेवढेच खत दिल्यामुळे रासायनिक खते पिकांच्या मुळाच्या कक्षेतच राहतात. यामुळे खताचा कार्यक्षमरित्या वापर होवून बचत होते.
 • तुषार सिंचन पद्धतीचा दर एकरी सुरवातीस लागणारा खर्च ठिबक सिंचन पद्धतीपेक्षा कमी आहे.
 • तुषार सिंचन पद्धतीकरिता जमिनीच्या सपाटीकरणाची गरज नाही.
 • रान बांधणी करावी लागत नाही.
 • माजुरांवरील खर्च कमी येतो.
 • पिक उत्पादनात २५ ते ३० टक्के वाढ होते.

हि सर्व वैशिष्टे किवा फायदे सिचन पद्धतीचा योग्यरीतीने आणि योग्य वातावरणात वापर केल्यास मिळू शकतात. यासठी या पद्धतीचा योग्य आराखडा तयार करुन पाहिजे. तेवढ्या अश्व शक्तीचा आणि दाबाचा पंप सेट वापरल्यास हि सिंचन पद्धत उपयुक्त ठरते.

तुषार सिंचन पद्धतीमुळे उत्पादनात झालेली वाढ व पाण्याची बचत :

Table

मांडणी आणि आराखडा :

तुषार संचाची व्यवस्थित मांडणी करण्यावर त्यापद्धतीचे यश अवलंबून असते. म्हणून त्या बाबतीत अधिक काळजी घेतली पाहिजे. त्यातील काही प्रमुख बाबी पुढील प्रमाणे आहे. तुषार संचाचा आराखडा तयार करण्याकरिता खालील माहितीची आवश्यकता आहे.

शेताची माहिती : क्षेत्रफळ, लांबी, रुंदी, उतार.

मातीचा प्रकार : मध्यम, हलकी, भारी, जमिनीची खोली, पाणी धारण क्षमता, पाणी शोषन क्षमता इ.

पीकाची माहिती : पीक पद्धती, पाण्याची गरज, दोन पाळ्यातील अंतर, हंगाम.

हवामान : वाऱ्याची दिशा, वेग, बाष्पीभवन.

पाण्याचा स्त्रोत : पाण्याची उपलब्धता, पाणी किती आहे, विहीर, नाला, नदी इत्यादी, पाण्याची प्रत, विजेची उपलब्धता किती वेळ आहे.

संचाची मांडणी :

तुषार सिंचन संचाचा आराखडा हा मुख्यत्वे संचाच्या उपनलिका, उपमुख्य पाईप, मुख्य पाईप यांच्या शेतातील मांडणीवर अवलंबून असतो. या सर्व पाईपांची मांडणी शेताच्या लांबी रुंदीवर आणि चढ उतारावर अवलंबून असते. पाण्याचा स्त्रोत शेतात आहे कि, शेतापासून दूर आहे, शेतात असल्यास मध्यभागी आहे कि, शेताच्या कडेला आहे याचासुद्धा पाईपपांच्या मांडणीकरीता विचार करावा लागतो. साधारणपणे उपनलिका शेताच्या मुख्य उताराच्या दिशेला आडव्या टाकतात. त्यामुळे या पाईपावर असणाऱ्या सर्व स्प्रिंकलर्सपासून पडणारे पाणी जमिनीवर सारख्या दाबाने पडेल. सर्व पिकाला शेतात सर्व ठिकाणी सारखे पाणी मिळणार याची खात्री राहते. उपनलिकेची जागा निश्चित केल्यानंतर उपमुख्य पाईप आणि मुख्य पाईप ची जागा निश्चित होते.

वाऱ्याची दिशा व वेग :

वाऱ्याची दिशा व वेग यांचा तुषार सिंचनाच्या पाणी समगुनकावर फार परिणाम होतो. शेतात सर्व ठिकाणी सारखे पाणी पसरवन्याकरीता वाऱ्याच्या दिशेचा विचार करावा लागतो. ज्या दिशेला वर वाहतो त्या दिशेला पाण्याचा फवारा एका बाजूला ओढला जातो. म्हणून ज्या भागात वाऱ्याचा वेग जास्त असतो. त्या भागात उपनलिका या वाऱ्याच्या दिशेला आडव्या टाकतात. असे केल्यामुळे दोन उपनलीकेतील अंतर जास्त ठेवता येते. परंतु उपनलिकेवरील दोन स्प्रिंकलर्समधील अंतर कमी करावे लागते.

स्प्रिंकलर्समधील अंतर :

सर्व पिकाला सारखे पाणी मिळावे म्हणून दोन उपनलिकेतील आणि दोन स्प्रिंकलर्समधील अंतर ठरविणे आवश्यक आहे. किंबहुना तुषार संचाच्या आराखड्याकरिता हि बाब अतिशय महत्वाची आहे. दोन स्प्रिंकलर्समधील आणि उपनलिकेतील अंतर हे स्प्रिंकलर्समधून बाहेर पडणाऱ्या पाण्यावर आणि शेतातील मातीच्या शोषण क्षमतेवर अवलंबून असते. याकरिता स्प्रिंकलर्स (तुषार) संच तयार करणाऱ्या कंपन्याकडून त्यांच्या स्प्रिंकलर्स विषयी ची माहिती पुस्तिका मिळावी. त्या पुस्तिकेत या माहितीचा समावेश असतो. या माहितीच्या आधारे स्प्रिंकलर्स अशारितीने निवडावेत कि, जे विहिरीतून मिळणाऱ्या प्रवाहाशी आणि पंपाच्या उपलब्ध दाबाशी सांगड घालणारे असतील. त्याचप्रमाणे जमिनीवर पडणाऱ्या पाण्याचा वेग मातीच्या शोषण क्षमतेपेक्षा कमी असला पाहिजे. त्यामुळे पाणी पृष्ठभागावर साचणार नाही. वेगवेगळ्या मातीची पाणी शोषण क्षमता वेगळी असते. त्याविषयीची माहिती खाली दिली आहे.

मातीची पाणी शोषण क्षमता :

मातीचा प्रकार पाणी शोषण क्षमता मिमी / तशी
हलकी १२.७ ते १९
मध्यम ७.६ ते १२.७
भारी   ३.८ ते ७.६

पाण्याचा दाब आणि समगुणक यांचा परस्पर संबंध आहे. जमिनीवर पडणाऱ्या पाण्याचा समगुनक हा ९० टक्क्यापेक्षा जास्त असावा. ज्या दाबला पाणी समगुणक जास्त मिळतो त्याच दाबाने स्प्रिंकलर्स चालविले पाहिजे. योग्य दाब नसल्यास पाण्याचे थेंब लहान अथवा मोठ्या आकाराचे राहतील.
वरील माहितीच्या आधारे स्प्रिंकलर्सला लागणारा दाब आणि स्प्रिंकलर्समधील अंतर निवडू शकतो. समजा मातीची पाणी शोषण क्षमता ताशी १० मि.मी. आहे. वरील तक्त्यावरून ४ x २.५ मि.मी. व्यासाचा स्प्रिंकलर निवडल्यास या स्प्रिंकलर मधून २.५ किग्रॅ / सेमी या दाबला १३०० लिटर एका तासाला पाणी बाहेर जमिनीवर पडेल. या स्प्रिंकलर मधील १२ x १२ मी. असल्यास पाणी पडण्याचा ९.०२ मि.मी. / ताशी असेल. हा वेग पाणी शोषण क्षमतेपेक्षा कमी आहे. म्हणून हे स्प्रिंकलर्स आपण १२ x १२ मीटर अंतरावर ठेऊ शकता.

पाण्याची आणि विजेची उपलब्धता :

पाण्याचा स्त्रोत शेतात आहे, शेताजवळ आहे किंवा दूरवर आहे याविषयी माहिती आवश्यक आहे. शेतात विहीर असल्यास कुठे आहे हे शेताच्या नकाशात दाखविले पाहिजे. विहिरीची जागा कोठे आहे त्यावर सुद्धा तुषार संचाची मांडणी अवलंबून असते. एकूण पाणी किती उपलब्ध आहे, किती वेळ पाणी उपसु शकतो याचा विचार करावा लागतो. कारण यावरून आपण एका वेळेस किती स्प्रिंकलर्स चालवू शकतो याचे गणित मांडता येते.

सिंचन कालावधी :

एकदा एका ठिकाणी स्प्रिंकलर्स आणि उपनलिका टाकल्यास या संचाने पिकाला पाहिजे तेवढे पाणी देण्यास किती वेळ लागतो हे ठरविता येते. उदा. यापूर्वी आपण पहिले कि, निवडलेल्या एका स्प्रिंकलरमधून एका तासाला जवळ जवळ ९.०२ मि.मी. पाणी जमिनीवर पडते. समजा या संचाने पिकाला ४५ मि.मी. पाणी द्यावयाचे आहे. तर सिंचनास एकूण ५ तास वेळ लागेल. वीज जर दिवसातून १० ते १२ तासच मिळत असेल तर आपणास या संचाने दिवसात दोन ठिकाणी पाणी देता येईल. म्हणजे हा तुषार संच दिवसात दोन वेळेस चालविता येईल.

तुषार संचाची उपनलिकांची आणि स्प्रिंकलर्सची संख्या :

उपलब्ध पाण्याचा प्रवाह विचारत घेऊन एका वेळेस किती स्प्रिंकलर्स चालवू शकतो हे निश्चित करावे लागते. समजा पाण्याचा प्रवाह सेकंदाला ६ लिटर आहे. म्हणजे एका तासात २१६०० लिटर्स पाणी मिळेल. या पाण्यावर एका वेळेस २१६०० / १३००= १६ स्प्रिंकलर्स चालविता येतील. एका उपनलीकेवर ८ स्प्रिंकलर्स बसविल्यास दोन उपनलिका तुषार सिंचास लागतील. दोन स्प्रिंकलर्स मध्ये १२ मीटरचे अंतर असल्यामुळे उपनलीकेची लांबी ९६ मीटर होईल.

संचाची मांडणी :

संचाची मांडणी करत असताना संच कायम स्वरूपी असावा कि एका ठिकाना वरून दुसऱ्या ठिकाणी हलविता येणारा असावा हे ठरविले पाहिजे. अर्थात हा निर्णय पाण्याचा स्त्रोत आणि पिक पद्धती यावर अवलंबून असतो. काही नमुनेदार संचाची मांडणी खाली दिली आहे.
मांडणी १ : सिंचनक्षेत्र जास्त असल्यास उपमुख्य पाईपांचा उपयोग करावा लागतो.
मांडणी २ : क्षेत्र कमी असल्यास उप नलिका मुख्य नलिका पाईपालाच जोडतात.
मांडणी ३ : क्षेत्र कमी आणि विहीर शेताच्या मध्यभागी असल्यास हि मांडणी करतात.

तुषार संच आराखडा :

संचाची मांडणी केल्यानंतर आराखडा तयार करावा.

पाण्याचा स्त्रोत, प्रवाह आणि भिजणारे क्षेत्र :

पाण्याचा स्त्रोत आणि प्रवाह निश्चित केल्यानंतर एका वेळेस किती स्प्रिंकलर्स चालवू शकतो हे यापूर्वी पहिले. एकूण १६ स्प्रिंकलर्स मधून २१६०० लिटर्स पाणी एका तासाला पिकाला मिळेल. या पाण्याने एका वेळेस २३०४मी पिकाचे क्षेत्र भिजवता येईल या संचाने एकूण ४६०८मी क्षेत्रास एका दिवसात पाणी देता येईल. कारण दिवसात वीज १० ते १२ तासच मिळणार असल्याने तुषार संच दोन वेळेस चालवता येईल. एका उपनलीकेवर आठ स्प्रिंकलर्स असल्यामुळे याकरिता ३ लिटर एका सेकंदाला प्रवाह उपनलिकेतून वाहील.

उपनलीकेची लांबी आणि व्यास :

उपनलीकेवर आठ स्प्रिंकलर्स १२ मीटर अंतराने असल्यामुळे उपनलिकेची लांबी ९२ मीटर असेल. उपनलीकेचा व्यास हा प्रवाह, दाब आणि घर्षण दाब व्यय लक्षात घेऊन निश्चित करता येतो. समजा स्प्रिंकलर्स करिता २५ मीटर दाब लागतो. अपेक्षित घर्षण दाब व्यय हा सुमारे २० टक्के
गृहीत धरतात. यामुळे आपणास पाणी समगुणक ९० टक्क्यापर्यंत मिळतो. या ठोकताळ्यावरून
आणि खालील तक्त्यावरून उपनलिकेचा व्यास ठरवितात.

अपेक्षित घर्षण दाब २०/१००x२५=५ मीटर आहे. वरील तक्त्यानुसार २ लि. /सें. प्रवाहाकरिता ५ से.मी. व्यासाच्या १०० मीटर लांब उपनलिकेतून २.१६ मीटर घर्षण दाब व्यय होईल असे दिसून येते. हा घर्षण दाब व्ययापेक्षा कमी आहे. म्हणून आपण ५ से.मी. व्यासाचा पाईप उपनलिकेकरता निवडू शकतो.

मुख्य पाईप व्यास आणि लांबी :

मुख्य पाईपाचा व्यास पाण्याच्या प्रवाहावर अवलंबून असतो. हा प्रवाह मुख्य पाईपावर असलेल्या उपनलीकेच्या संख्येवरून ठरवितात. समजा दोन उपनलीकेचे पाणी एका वेळेस मुख्य पाईप मधून वाहते. दोन उपनलिकेवरील एकूण १६ स्प्रिंकलर्स आहेत. एकून प्रवाह ५.८ लिटर प्रती सेकंद असेल. हा पाण्याचा प्रवाह या मुख्य पाईपातून वाहत असताना घर्षण दाब व्यय सुद्धा कमीत कमी असावा लागतो. सर्वसाधारणपणे घर्षणाने होणारा दाब व्यय लांबीच्या १.५ ते २ टक्के एवढा आपेक्षित आहे. समजा मुख्य पाईप १२० मीटर लांब आहे. तर घर्षण दाब व्यय जवळजवळ १.८ ते २.४ मीटर दरम्यान अपेक्षित आहे. हा घर्षण दाब व्यय लक्षात घेऊन पुढील तक्त्याचा उपयोग करून मुख्य पाईपाचा व्यास ठरविता येऊ शकतो.

उपनलिका व्यास आणि घर्षण दाब व्यय :

प्रवाह लि./सें. उपनलिकेचा व्यास सें.मी.
७.५ १०
घर्षण दाब-व्यय,मी / १०० मीटर लांबीकरिता
२.८३ ०.३९
६.०० ०.८३
१०.२२ १.४२
१५.४७ २.१४ ०.५३
२१.६७ ३.०० ०.७५
२८.८३ ४.०० १.००
३६.९२ ५.१४ १.२८
४५.९२ ६.२६ १.५८
१० ५५.८३ ७.७५ १.९२

या तक्त्यावरून ६ लिटर प्रती सेकंद प्रवाहाला वर उल्लेखिलेला घर्षण दाब व्यय लक्षात घेतल्यास, ७.५ से.मी. व्यासाचा मुख्य पाईप तुषार संचास पुरेसा होतो. थोडासा आर्थिक दृष्टीकोन लक्षात ठेऊन सुद्धा पाईपची निवड करावी लागते.

तुषार संचास लागणारा दाब :

तुषार संचास लागणारा एकूण दाब हा स्प्रिंकलर करिता लागणारा दाब, स्प्रिंकलरच्या पाईपाची उंची, उपनलिकेतून आणि मुख्य पाईपमधून होणारा घर्षण दाब व्यय आणि स्थानिक दाब व्यय यांच्या बेरजेइतका पाहिजे, अर्थात यात विहिरीतून पंपास जोडलेल्या पाईपाची उंची मिळवली पाहिजे. स्थानिक दाब व्यय सर्वसाधारणपणे घर्षण दाब व्यय आणि स्प्रिंकलर्सला लागणारा दाब यांच्या १०% धरतात.
वर निवडलेल्या स्प्रिंकलरला २५ मीटर पाण्याचा दाब लागतो. स्प्रिंकलर पाईपाची उंची १ मीटर असते. घर्षण दाब व्यय ४.७२ मीटर आहे. म्हणजे स्थानिक दाब व्यय ३ मीटर असेल, विहिरीतील पाईपाची उंची ६ मीटर असल्यास एकूण दाब जवळजवळ ४० मीटर होईल. इतका दाब देणारा पंप तुषार संचास लागेल.

तुषार संच बसवण्यापूर्वी हि काळजी घ्या :

तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करण्यापूर्वी हि पद्धत आपल्या शेताच्या आकारमानासाठी व पिक पद्धतीस जास्तीत जास्त कार्यक्षम व स्वस्त कशी होईल याकडे अधिक लक्ष पुरवावे लागेल. त्यासाठी आवश्यक साहित्याच्या उप्लाब्धतेशिवाय जमीन, पाणी, पिके, हवामान व उर्जेचे साधन ह्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतील. उर्जेचे साधन जर विद्युत शक्ती असल्यास तिचा नियमित पुरवठा असणे जरुरीचे आहे. अन्यथा डीझेल पंपाची सोय करणे जरुरीचे असते. पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन जमिनीच्या प्रकारानुसार योग्य त्या पिकांची निवड निश्चित करून ओलिताखाली येणाऱ्या क्षेत्रास आवश्यक तेवढेच तुषार साहित्य घ्यावे.

तुषार संच बसविल्यानंतर घ्यावयाची काळजी :

या पद्धतीत पाणी फवारून दिले जात असल्यामुळे हवेत बाष्पीभवनामुळे होणारा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी तुषार पद्धत शक्यतो दुपारी चालवू नये. हि पद्धत चालू असताना वारा वाहत असणे जरुरी आहे. जास्त वेगाने वारा वाहत असल्यास ओलिताच्या क्षेत्रावर पाण्याचे समतोल वितरण होत नाही. तेव्हा अशा वेळेस हि पद्धत सकाळी किंवा सायंकाळी जेव्हा वारा मंद असतो तेव्हाच चालवावी किंवा लॅटरल पाईपलाईन मधील व तुषार तोट्यातील अंतरात बदल करून हि पद्धत चालवावी, जेणे करून पाणी थोडेफार समप्रमाणात देता येईल.
हंगामाच्या सुरुवातीला किंवा नेहमीच तुषार संच चालू करताना, लॅटरल पाईपचे बुच काढून ठेवावे व त्यातून काही वेळेसाठी पाणी बाहेर पडू द्यावे. म्हणजे पाईपमधील कचरा किंवा इतर अडथळे निघून जातील आणि नंतर बंद करावे.
लॅटरल पाईप दुसऱ्या जागेवर वाहून नेताना, तुषार तोट्या, आर.क्युआर.सी. मधून काढून निट उभ्या धरून न्याव्यात. तुषार पाईपाची जोडणी करताना. एका पाईपचे टोक दुसऱ्या पाईप च्या कपलरमध्ये टाकताना, त्या टोकाला माती किंवा कचरा लागलेला नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा त्यामुळे कपलरच्या रबरी रिंगाचे नुकसान होते. कपलर मधील रबरी रिंग बदलताना तिची दिशा फार महत्वाची असते. ती उलटी बसविल्यास जोडामधून पाणी गळत राहते.
पाण्याच्या साठ्यात काडी कचरा जास्त असल्यास सक्शन पाईपच्या फुट व्हाल्वला बारीक छिद्राची जाळी गुंडाळावी. उन्हाळ्यात विहिरीतील पाण्याची खोली वाढते व त्यामुळे खरीप किंवा रबी हंगामात जेवढ्या तोट्याणी पाणी व्यवस्तीत देता येते त्यापेक्षा त्यांची संख्या कमी करावी लागते. पंपाचा दाब जेवढ्या तोट्यांना पुरतो म्हणजे किती तोट्या लावल्यानंतर पाण्याचा फवारा व्यवस्थित फेकला जाते तो पाहावा व त्यानुसार तोट्यांची संख्या कमी करावी. म्हणूनच उन्हाळ्यात दुसऱ्या हंगामापेक्षा ओलिताचे क्षेत्र कमी होते.

तुषार संचाची घ्यावयाची निगा :

ह्या पद्धतीत तुषार पाईपलाईन, फिटिंग्ज आणि तुषार तोट्या हे महत्वाचे घटक असल्यामुळे त्यांची व्यवस्थित निगा राखणे महत्वाचे आहे. ती खालील प्रमाणे घ्यावी.

 • कोणत्याही प्रकारचे तेल, ग्रीस किंवा वंगण तुषार तोट्यांना लावू नये.
 • तुषार तोटीतील वॉशर डीझेल असल्यास बदलून टाकावेत.
 • तुषार तोटीच्या स्प्रिंगचा तन कमी झाल्यामुळे तुषार तोटीच्या फिरण्याचा वेग कमी होतो. तेव्हा स्प्रिंग थोडी ताणून तिचा ताण वाढवावा किंवा स्प्रिंगच बदलावी.
 • सर्व फिटिंग्जचे बोल्ट व नट घट्ट करावेत.
 • तुषार पाईप, टी बेंड, आर.क्यू.आर.सी. इत्यादी मधील रबर रिंग काढून साफ करावी. ती घर्षणामुळे झिजली असल्यास बदलून टाकावी. अन्यथा तेथून पाण्याची गळती होते.
 • आर.क्यू.आर.सी. मधील रबरी बॉल झिजल्यास संच चालू असताना त्यामध्ये राईझर पाईप लावलेला नसेल तर त्यातून पाणी बाहेर येत राहते. असे झाल्यास तो बॉल बदलावा.
 • तुषार पाईपाना लावलेला हुक व त्याच पाईपाचे शेवटचे टोक यामधील अंतर २.५ ते ३ इंचापेक्षा कमी नसावे. तसे झाल्यास संच चालू स्थितीत असताना अशा ठिकाणचे पाईप सटकतात. त्यासाठी वरील अंतर ठीक करावे.
 • तुषार संचाच्या विविध भागांची साठवणूक करताना सर्व रबर रिंग कपलरमधून काढून थंड व अंधाऱ्या जागेत ठेवाव्यात. तसेच तुषार तोट्या कोरड्या जागेत उभ्या ठेवाव्यात.

तुषार सिंचन समस्या आणि उपाय :

तुषार सिंचनामध्ये काही समस्या निर्माण होतात. त्याची माहिती व त्यावरील उपाय पुढे दिले आहेत.

समस्या : पंपसेटद्वारे दाब व्यवस्थित निर्माण न होणे.

उपाय : अ) सक्शन लिफ्ट चेक करावा. सक्शन लिफ्ट प्रमाणाच्या बाहेर असेल तर पंप    पाण्याच्या अजून जवळ बसवावा म्हणजे सक्शन लिफ्ट कमी होईल व पंपाद्वारे दाब निर्मिती व्यवस्थित होईल.

ब) सक्शन पाईपचे कनेक्शन, फिटिंग चेक करावे. गळती आढळल्यास कनेक्शन आवळून घ्यावे.

क) फुटव्हॉल्व स्ट्रेनर चेक करावा.

ड) डीलीव्हरी पाईप व त्यावरील गेट व्हाल्व चेक करावा. प्रायमिंगच्या वेळी तो पूर्णपणे बंद ठेवावा आणि पंप चालू असताना उघडा ठेवावा. पंपाच्या इम्पेलरची फिरण्याची दिशा योग्य आहे कि नाही हे बघावे.

समस्या : स्प्रिंकलर जर व्यवस्थित फिरत नसेल.

उपाय : अ) दाब चेक करावा. दाब निर्मिती योग्य प्रमाणात नसेल तर स्प्रिंकलर पाहिजे त्या वेगाने फिरू शकणार नाही.

ब) स्प्रिंकलर बेअरिंग चेक करावे. त्यामध्ये काही अडकले असल्यास लाकडी काडीने साफ करावे.

क) स्प्रिंकलर बेअरिंग चेक करून व्यवस्थित बसवाव्यात .

ड) बेअरिंगचे वायसर खराब असतील तर बदलावेत.

इ) स्प्रिंकलर नॉझल्सचा स्प्रिंग आर्म व्यवस्थित फिरत नसल्यास अथवा वाकडा झाला असल्यास तो व्यवस्थित करून बसवावा.

फ) स्प्रिंग आर्म स्प्रिंगचे टेंशन चेक करावे.

समस्या : फिटींग्ज अथवा कपलरद्वारा गळती.

उपाय : अ) कपलर आणि फिटिंग्जच्या सिलिंग रिंग (वायसर) चेक करून व्यवस्थित बसल्या आहेत याबद्दल खात्री करावी.

ब) कपलरच्या थ्रेडसमध्ये घाण अडकली असल्यास साफ करावी आणि पुन्हा सिलिंग रिंग बसवावा.

क) कपलरला जोडलेले पाईपचे शेवटचे तोंड चेक करावे. वाकडे झाले असल्यास व्यवस्थित करून घ्यावे.

ड) बेंडस, टीज, रेड्यूसर फिटिंग्ज व्यवस्थित कराव्यात.

समस्या : वाऱ्याचा वेग प्रमाणापेक्षा जास्त असल्याने पाणी समप्रमाणात न बसणे.

उपाय : साधारणपणे फवारा सिंचनात वाऱ्याच्या गतीस फार महत्व आहे. सामन्यत: वाऱ्याचा वेग ताशी ८ ते १० कि.मी. च्या आत असताना संच चालवावा. म्हणून शक्यतो उन्हाळ्यात सकाळी आणि संध्याकाळी संच चालवावा. यावेळी साधारणपणे वाऱ्याचा वेग कमी असतो.

       

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *